नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. संदर्भ दिला जाणार्या व्यक्तीच्या/वस्तूच्या अनुषंगाने एखादी व्यक्ती, वस्तू, किंवा ठिकाण यांच्यातील सहसंबध आणि दिशा दर्शविण्यासाठी भाषेत काही विशिष्ट शब्द योजिले जातात. या शब्दांना दिशाबोधक शब्द असे म्हणतात. सदर नोंदींमध्ये वर्णन केलेले वर, खाली आणि मध्ये हे तिन्ही शब्द दिशाबोधक आहेत. महाराष्ट्राच्या विविध बोलींमध्ये ‘वर’-‘मधे’-‘खाली’ या संकल्पनांसाठी पुढीलप्रमाणे वैविध्य आढळून आले आहे. संदर्भ दिला जाणार्या व्यक्तीच्या/वस्तूच्या डोक्याच्या वरची दिशा दर्शविण्याकरता महाराष्ट्राच्या विविध बोलींमध्ये वर, वरती, वोरती, वरी, वरता, वर्त, वरतं, वर्हं, वर्हे, वर्या, वरलाकडं, वरला, वर्ते, उच़्च़, उच्चे, उचय, उप्पर, ऊपर, आर, एर, रीब, अगर, वं, इ. शब्द आढळून येतात. संदर्भ दिला जाणार्या व्यक्तीच्या/वस्तूच्या पायाच्या खालची म्हणजेच जमिनीकडची दिशा दर्शविण्याकरता महाराष्ट्राच्या विविध बोलींमध्ये खाली, खाल, खाल्ती, खाल्तं, खाल्ता, खाल्ते, खालं, खाला, खाले,निच़े, निचे, निच़्च़े, निच्चे, निचं, हेठ, हेटे, येटा, हेटला, बुडी, बुड, बुटे, खाल्या, सकल, सखैल, पाट, खालो, बाश, बास, नेळू, नेडू, इ. शब्द आढळून येतात. संदर्भ दिला जाणार्या दोन व्यक्तींच्या/ वस्तूंच्या मधली स्थिती दर्शविण्याकरता महाराष्ट्राच्या विविध बोलींमध्ये मध्ये, मदी, मदे, मधे, मधी, मद्दे, मधाई, मधं, मंदी, मदेर, मदित, मंदात, मंदिको, मंधात, मदात, मधात, मदिन, मध्यभागी, मधोमध, मध्यसेंटर, मदयभागी, मध्यंभागी, मदोमद, मध्यभागात, बिच़ात, बिचमे, बिचमंदी, बिच, बिछामदे, बिचमंदे, बिचमधी, मिसमे, मज़ार, मज़ारमा, मदार, मजारू, मजरमा, मजमा, मज़मा, मझ़ात, मजरमं, मधमा, मद्यन्त्र, मदीमा, मधंमा, वसामा, वच्चे, वचमा, वछमे, मध्यतंर, मध्यानतरी, मिने, मनं, भरमदी, सेंटर, सेंटरला, , इ. शब्द आढळून येतात. सदर सर्वेक्षणात ‘वर’ या शब्दाचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर असून त्याखालोखाल ‘वरती’ हा शब्द मिळाला आहे. अशाच अर्थाने ‘वर्त’ हा शब्द विदर्भात आढळून आला आहे. तर ‘वर्या’ हा शब्द नागपूरच्या भिवापूर आणि भंडारा जिल्ह्याच्या तुमसर या हिंदी भाषिक प्रदेशाला जवळ असलेल्या तालुक्यात तुरळक प्रमाणात मिळाला आहे. त्याचप्रमाणे ‘वरी’ हा शब्द मराठवाड्यात व्यापक प्रमाणात मिळाला असून जळगाव आणि वाशिम या जिल्हयातही अपवादात्मक सापडला आहे. याचबरोबर बीड जिल्ह्यात तुरळक प्रमाणात ‘वरलाकड’ आणि ‘व’ हे शब्दही मिळाले आहेत ‘-एर’ हा प्रत्यय सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा राज्यास लागून असणार्या सावंतवाडी तालुक्यात आढळून आला असून ´-आर´ हा प्रत्यय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कट्टा या गावात क्वचित आढळून आला आहे. मंदी हा शब्द महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात आढळून आला असून त्याचे मदे, मंदी, मधे, मंधी हा ध्वनिभेद आढळले आहेत. मधात हा शब्द मराठवाड्यात आणि विदर्भात प्रामुख्याने प्रचलित आहे. याव्यतिरिक्त जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील मांगलवाडी येथे आणि रावेर तालुक्यातील वडली या गावातही हा शब्द आढळला आहे. यात मंधात, मदात, मझात, मजात, मद्दीत असे उच्चारवैविध्य आढळते. यापैकी मंदात हा उच्चार विदर्भात मोठ्याप्रमाणात असून तुरळक प्रमाणात जामनेर तालुक्यातील वाघारी या गावात मिळाला आहे. मिने हा शब्द पालघर जिल्ह्यातील कॅथलिक सामवेदी समाजत तर मन हा शब्द पालघरमधील वावडळ समाजात आढळून आला आहे. त्याचप्रमाणे ‘मध्यभागी’ या शब्दाचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर असून त्याचे मध्याभागी, मदेभागी, मध्यभागात, मद्यामदी, मदेभागात हे ध्वनिभेद आहेत. मदोमद हा शब्द प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात आणि त्याखालोखाल कोल्हापूर आणि चंद्रपूर जिल्हयात प्रचलित आहे. मद्यास्ती हा शब्द वर्धा जिल्हयात तर मद्यस्ती हा शब्द जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात दिसून आला आहे. अशाचप्रकारे मध्यसेंटर हा शब्द कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील खुपिरे गावात दिसून आला आहे. मंदिको हा शब्द नागपूर जिल्ह्यातील नागपूर तालुक्यातील भिवापूर या गावात तर बिचला आणि बिचवर हे शब्द अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात कुसूमकोट(खु.) आणि कासमार या गावात कोरकू समाजात दिसून आले आहेत. मेंव हा शब्द रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे सापडला असून मांदा हा शब्द रायगड जिल्ह्यात महादेव कोळी समाजात तुरळक प्रमाणात दिसून आला आहे. बिच हा मूळ शब्द असून त्यास सप्तमीचे स्थानवाचक प्रत्यय लागून होणारी बिच़मे, बिचमे, बिचात, बिचमदी, बिचमंदी, बिचमधी,बिचमदात, बिचला, बिचला, बिचमनी, बिचवर, बिछात, बिचोबिच ही रूपे मोठ्याप्रमाणात विदर्भात आढळून आली आहेत. याशिवाय जळगाव, नांदेड, सिंधुदुर्ग या जिल्हयातील मुस्लिम आणि चांभार समाजात हा शब्द आढळून आला आहे. मज़ार हा शब्द प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गाडेगाव येथे अपवादात्मक स्वरूपात आढळून आला आहे. या शब्दात ध्वनीबदल होऊन मजार, मझार, मजर, मदार इ. शब्द मिळाले आहेत. मजारमा हा शब्द धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील खेडे आणि सोनगीर या गावांत सापडला असून या शब्दाचे मजारमा आणि मजरमं हे ध्वनीभेद आहेत. तर ‘मजरमा’ हा शब्द नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा आणि नंदुरबार तालुक्यातील धानोरा या गावी अहिराणी भाषकांनी उच्चारला आहे. त्याचप्रमाणे मजमा हा शब्द मुख्यतः नंदुरबार जिल्हयात प्रचलित असून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिंगावे येथेही वापरात असल्याचे आढळून आले आहे वच हा शब्द नंदुरबार, गुजर लोकसंख्या जास्त असलेल्या प्रकाशा या गावात जास्त प्रमाणात आढळून आला असून या शब्दात वच्चे, वचमं, वचमे, वचमा हे उच्चारभेद आहेत याचबरोबर वच हा शब्द पालघर मधील गिरगाव येथे दुबळा या गुजराती भाषकांत आणि धोडीया या समाजात आढळला आहे. मध्यंतर ह्या शब्दात मध्यंतरी, मध्यांतरी, मध्यंतारी हे ध्वनिभेद असून या शब्दाचा प्रसार मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्हयातील ठराविक गावात आणि विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथे काही प्रमाणात आढळला आहे. ‘सेंटर’ हा शब्द वेगवेगळ्या जिल्ह्यात त्या त्या भागात प्रचलित असलेल्या अन्य शब्दाबरोबर दिसून येतो. खाला हा शब्द सिंधुदुर्गातील वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तालुक्यात तसेच पालघर जिल्ह्यातील वसई येथे रोमन कॅथलिक या सामाजात प्रामुख्याने प्रचलित असून सामवेदी ब्राम्हणातही आढळून आला आहे. खाल हा शब्द प्रामुख्याने पालघर, नाशिक, रायगड आणि पुणे जिल्हयात कातकरी समाजात आढळून आला आहे. अशाचप्रकारे खालेहा शब्द पालघर जिल्हयात व्यापक प्रमाणात आणि नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिल्हयात तर जळगाव, गोंदिया या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळला आहे. याच शब्दाचा ध्वन्यात्मक भेद – खालं – हा रायगड, हिंगोली, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात दिसला आहे. सकल आणि सखईल हे शब्द केवळ सिंधुदुर्गात कोलगाव, सातर्डा आणि आयी या गोव्य़ा बाजूकडील गावात मिळाले आहेत. निचे हा शब्द जास्त प्रमाणात सिंधुदुर्गातील मुस्लिम सामाजात वापरात असल्याचे आढळले आहे तर पालघर आणि नंदुरबार येथे तुरळक प्रमाणात वापरात आढळला आहे. या शब्दात निच्च़े आणि निच़े असे ध्वनिभेदही नंदुरबार येथे आढळले आहेत. हेटा हा शब्द हेटे, हेठ, हेटला अशा विविध उच्चार भेदांसह रायगडातील महदेव कोळी (ता. मुरूड), तसेच नंदुरबार आणि धुळे येथील भिल्ल या विशिष्ट समाजात आढळला आहे. नेडू हा शब्द नळू या उच्चार बदलासह केवळ जळगावातील वैजापूर गावात पावरा समाजात मिळाला आहे.